कथाकथन, काव्य वाचन व लेखन क्षेत्रात सातवीतील विद्यार्थिनीची उत्कृष्ट कामगिरी

0

सणसवाडी (विठ्ठल वळसे)। कथा, कविता तयार करून कथाकथन, काव्य वाचन या क्षेत्रात हवेली तालुक्यातील वढू खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सातवीतील विद्यार्थिनीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गौरी विजय दरेकर असे तिचे नाव असून चौथीत असल्यापासूनच या चिमुकलीने आपले लेखन कौशल्य सर्वांसमोर आणले. बालदिनानिमित्त या चिमुकलीशी केलेली खास बातचीत.

40 कथांचे लेखन
गौरीने आतापर्यंत 40 कथांचे लेखन केले आहे. एवढेच नव्हे तर कविसंमेलन, स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यातही ती पारंगत आहे. तिचे संभाषण कौशल्य सर्वांनाच आकर्षित करते. साहित्यिक, शिक्षक सचिन बेंडभरपाटील व मुख्याध्यपिका सुदर्शना शेलार यांनी तिला मार्गदर्शन केले. तालुका स्तरावरील साहित्य संमेलनातही ती भाग घेते.

सूत्रसंचालनाचे कौशल्य
गौरीने लिहीलेल्या कथा आणि कविता वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या आहेत. काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालनही ती उत्कृष्ट करते. तसेच कथाकथनातही तिने मोठा नावलौकीक मिळविला आहे. शाळेत तिने एक तासाचे सूत्रसंचालन तयार करून ते सादर केले होते. गौरीने या क्षेत्रात कार्यरत राहून स्वतःचा ठसा उमटवावा व वेगळी ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध साहित्यिक उत्तम सदाकाळ यांनी व्यक्त केली होती.

दहा मिनीटातच तयार करते कथा, कविता
मनातल्या कविता, शिंपल्यातले मोती या पुस्तकात तिच्या कविता व कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच भरारी हे तिचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गौरी मध्यम वर्गीय कुटुंबातील असून तिचे वडील शेतकरी आहेत. गौरी दिलेल्या विषयावर अगदी 10-15 मिनिटातच कथा, कविता करते, असे युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांनी तिच्याबद्दल बोलताना सांगितले. तिची हुशारी पाहून इतर विद्यार्थ्यांनाही हुरूप येतो. विविध स्पर्धांमधून तेही आपले कौशल्य सादर करतात. यामुळे शाळेचे नाव मोठे होत आहे.