जळगाव । येथील प्रभाकर कला संगीत अकादमीच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘अर्घ्य’ नृत्य महोत्सवातील विद्यार्थीनींच्या कथ्थक सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. ला.ना.विद्यालयाच्या गंधे सभागृहात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर यांच्या हस्ते व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कर्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अकादमीच्या संस्थापिका डॉ.अपर्णा भट-कासार व किरण कासार यांची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ.पाटील यांनी बोलतांना नृत्य कला प्राचीन असून माणसाला भाषा, प्रांतापलीकडे नेणारी आहे. मानवी भावविश्वाचा आरसा आहे. असे सांगून सृजनशील समाजासाठी अशा कलांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे सांगितले. आज रियालिटी डान्स शो मुळे पाश्चिमात्य कला हीच आपली कला वाटू लागली आहे, अशा काळात 21 वर्षे अव्हयात पणे खरी भारतीय नृत्य कला जपण्याचं कार्य डॉ.अपर्णा भट-कासार करीत आहे असे डॉ.पाटील यांनी सांगून त्यांचे अभिनंदन केले.
चार संगीत स्पर्धा
नृत्य महोत्सवाची सुरूवात गणेश, शिव व गुरूवंदनेने करण्यात आली. या महोत्सवात जा जा रे जा रे भवरा पिया को संदेशा दे जा हे राग भुपालीतील व त्रितालातील बंदिश, त्रितालातील तराणाच्या माध्यमातून कथ्थकचे सादरीकरण करण्यात आले. बंदिश, सरगम, तराणा व तोडे ह्या 4 संगीत प्रकारांची ‘देस’ रागातील रचना अर्थात चतरंग प्रभावीपणे सादर करण्यात आले. छोड रे… रे मोरी बैय्या ही राग बागेश्रीतील बंदिशीवर कथ्थक सादर करण्यात आले. मारू बिहाग रागातील त्रितालातील त्रिंवट सादर केले.
संस्थापिका डॉ.अपर्णा भट-कासार यांनी उपस्थितींची दाद मिळविली. त्रितालातील, धनकोनी कल्याण, रागातील सरगमने नृत्य महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. या महोत्सवात कोमल चौहान, श्रिया वडोदकर, ऐश्वर्या परशुरामे, चेतना भिवसने, तनया पाटील, साक्षी माळी, राधिका सरोदे, तन्वी लाड, शिवानी जोशी, हिमांनी पिले, रूतुजा महाजन, स्मृती चौधरी, अंजलिका कदम, मृण्मयी कुळकर्णी, पियुषा जावळे, श्रावणी उपासनी, अक्षया दाणी, अवनी जोशी, दिपिका घैसास, श्रावणी अर्णीकर, सेजल चौधरी, सानिका कानगो, भक्ती भोळे, रूची महाजन, समृद्धी रडे या विद्यार्थींनींचा सादरीकरणात सहभाग होता. त्यांना साथसंगत आनंद मोरे, तेजस मराठे, मनोज कुळकर्णी, प्रिया सायखेडे, गायत्री कुळकर्णी, गौरी कुळकर्णी आदिंनी केली.
रसिकांची उपस्थिती
प्रारंभी दिपप्रज्वलन व नटराज पुजन करण्यात आले. अकादमीच्या 21 वर्षाच्या वाटचालींची व डॉ.अपर्णा भट-कासार यांच्या कारकिर्दीविषयीचा लघुपट सादर करण्यात आला. सुत्रसंचालन डॉ.साधना पाटील व प्रा.स्नेहल परशुरामे यांनी केले. परिचय कोमल चौहान व श्रिया वडोदकर यांनी करून दिला. रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रविवार 6 रोजी सायंकाळी 6.30 वाजता. जुन्या व नवीन हिंदी चित्रपट गीतांवरील कथक शैलीतील सृजनशील नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे.समारोप सोहळ्यास जळगाव जनता सह. बँकेचे अध्यक्ष, माजी प्राचार्य अनिल राव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नृत्य महोत्सव विनामुल्य असून सर्व नागरिकांसाठी प्रवेश खुला आहे. मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन डॉ.अपर्णा भट-कासार व किरण कासार यांनी केले आहे.