लोणखेडा बायपास रस्त्यावर कारला अपघात ; पत्नीसह चौघे जखमी
नंदुरबार- कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा.अनिल देशमुख (रा.पिंपळगाव हरेश्वर) यांचे शहाद्याजवळ कार उलटून झालेल्या अपघातात निधन झाले. अनिल देशमुख हे कुटुंबासह खाजगी गाडीने (एम.एच.18 ए.जे.5466) ने शहाद्याहून मध्यप्रदेशातील सक्राळीत नातेवाईकांडे जात असताना वाहन उलटल्याने अपघात झाला. लोणखेडा बायपास रस्त्यावरील मयूर पेट्रोल पंप च्या पुढे शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यात त्यांच्या मेंदूत अती रक्तस्त्राव झाल्याने शहादा येथील सार्थक क्रिटिकेअरमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
कुटुंबातील चौघे सदस्य जखमी
या अपघातात त्यांच्या पत्नी उर्मिला अनिल देशमुख (43), मुलगा भार्गव अनिल देशमुख (18), हरबाबाई भटेसिंग राऊळ (60) व कार चालक कुलदीप भटेसिंग राऊळ (36, रा.दोंडाईचा) यांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर रूक्मिणी अॅक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अपघात घडला तेव्हा बबन परशुराम कोळी यांनी जखमींना उचलून दवाखान्यात दाखल केले. या अपघातातील मयत अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी रात्री 8.30 पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आजचा काळा दिवस ठरला.