बोरद। सर्वात कमी पावसाची नोंद होणारा यावर्षी जिल्हा नंदुरबार होता. अत्यल्प पाऊसमुळे बोरद परिसरात कपाशीची लागवड थोडी उशिराच झाली. ज्यांच्याकडे बागायतीची सोय होती, अशा शेतकर्यांनी कापूस लागवड साधारण मे महिन्याच्या शेवटी केली. परंतु कितीही झाले तरी पावसाच्या पाण्याचा पिकांवर योग्य परिणाम हा होतोच जर पाऊस टप्प्याने असेल. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत शेतकर्यांनी कापूस जगविलाच शेवटी काही प्रमाणात पाऊस झाला पण तो फायद्यापेक्षा नुकसानदायकच ठरला. आधीच पाऊस कमी आणि त्यात उत्पादन क्षमता कमी होणार आहे.तसेच कपाशीवर बोंड अळीसह बुरशीजन्यचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असून बळीराजा चिंतेत सापडला आहे.
कधी गारठा, सूर्यदर्शन, अवकाळी पाऊस याचा पिकावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बोरदसह परिसरात अनेक दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने त् याचा कापूस पिकावर परिणाम झाला आहे. शेतकर्याला अशा अस्मानी संकटाना नेहमीच तोंड द्यावे लागते. बोरद, मोड, धजापाणी, खरवड मालदा, तुळाजा, लाखापूर या बोरद परिसरात गावात कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. बुरशीजन्य रोगांमुळे उत्पन्नात घट होऊन खर्चही निघणे कठीण झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्याचे दर्शनही झाले नाही. त्यातच गारठाही गायब झाला आहे. त्याचा परिणाम हा कापूस पिकावर होताना दिसून येत आहे. यावर्षी कापसाला 7 ते 8 हजार रुपये भाव आहे. मात्र, अशा प्रकारे कापसावर पडलेल्या रोगामुळे उत्पन्नात घट होणार आहे.
शेतकर्यांचे शेतीचे गणित कोलमडले
कोरोना व टाळेबंदीमुळे शेतकर्यांचे शेतीचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. शासनाने आता शेतकर्याला आधार देण्याची गरज आहे. नेहमी एकरी 10 ते 12 क्विंटल येणारे कापसाचे उत्पादन 4 ते 5 क्विंटलपर्यंत यावर्षी आकडा गाठू शकते.पण अशाही परिस्थिती हवामान बदल व बोंडअळीमुळे ते हातातून जाईल की काय अशी चिंता शेतकर्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वाचला पाहिजे. म्हणून शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. परिसरात प्रत्येक गावात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे.
दीड एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती. या खर्चासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, सततच्या हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे कापसावर बोंडअळी बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे आता ते कर्ज परतफेड करणे कठीण झाले आहे.
-गणेशपुरी गोसावी, खरवड, ता.तळोदा
यावर्षी पाच एकर कापसाची लागवड केली आहे. जमीन बागायत असल्याने मे महिन्याच कापूस लावून मोकळा झालो. परंतु पावसाने दडी मारल्याने व हवामान बदलाने उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. त्यात बोंड अळीचे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाला आहे.
-जयपाल गिरासे, प्रतापपूर, ता.तळोदा