मुंबई : अभिनेता कपिल शर्मासोबत भांडण झाल्यानंतर त्याचा शो सोडणारा विनोदी अभिनेता सुनील ग्रोवरने कपिलचं भरभरून कौतुक केलं आहे. कपिलला सुनील ग्रोवरने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या असून कपिलनं प्रेक्षकांना सतत हसवत रहावं हीच इच्छा असल्याचं म्हंटले आहे. त्यामुळे कपिल – सुनीलमधील दुरावा दूर झाल्याचं बोललं जात आहे.
सुनील ग्रोवर सध्या ‘कानपूरवाले खुरानाज’ या आगामी कॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. या शोच्या लॉन्चिंगवेळी त्याला पत्रकारांनी कपिलच्या लग्नाबद्दल विचारलं. त्यावेळी सुनीलने कपिलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. ‘कपिलचं लग्न ठरल्याचं ऐकून मला खूप आनंद झाला. आम्ही एकत्र काम केलंय. आता त्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. त्यानं प्रेक्षकांना सतत हसवत रहावं हीच माझी इच्छा आहे. तो लोकांचं मनोरंजन करत राहील याचा मला विश्वास आहे, कारण कपिल खूप प्रतिभाशाली आहे,’ असं सुनील म्हणाला. कपिल येत्या १२ तारखेला गिन्नी चतरथ सोबत जालंधरमध्ये विवाहबद्ध होणार आहे. विशेष म्हणजे सुनीलचा हा नवीन शो आणि कपिलचा शो एकाच वेळी प्रसारित होणार आहे.