कपिल मिश्रा आता आंदोलन छेडणार

0

नवी दिल्ली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची फैरी झाडणारे कपिल मिश्रा आता आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मिश्रा यांनी 3 जून रोजी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची राजधानीतील संविधान क्लबमध्ये बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांना पाठवलेल्या सदर बैठकिच्या निंमत्रणाच्या संदेशात भ्रष्टाचारी गप्प आहेत, त्यामुळे जनताच आता बोलेल, असे म्हंटले आहे.

मिश्रा म्हणाले की, सहकार्‍यांशी चर्चा केली. इंडिया अगेंस्ट करप्शनच्या दुसर्‍या टप्प्याची सुरुवात करण्याची वेळ आली आहे. या मोहीमेत अण्णा आंदोलन आणि इंडिया अगेंस्ट करप्शनचे अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मिस कॉल करण्याचे अपिल केल्यानंतर किमान एक लाख लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. केजरीवाल यांच्या विरोधात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पुराव्यांचे प्रदर्शन 3 जून रोजी मांडण्याचा निर्णय झाला आहे. केजरीवाल सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करायचा किंवा राईट टू रिकॉल सारख्या पर्यायाचा अवलंब करायचा हे या आंदोलनात ठरवण्यात येईल.

केजरीवाल माणसे बघून नियम लावत असल्याचा आरोप कपिल मिश्रांनी केला. केजरीवाल यांनी एका ऑडियो टेपच्या आधारावर असीम अहमद खान यांची हकालपट्टी केली. मात्र त्याचवेळी त्यांनी पुरावे असतानाही सत्येंद्र जैन यांची पाठराखण केली. आरोग्य विभागातील तीन घोटळे उघड केले. या घोटाळ्यांमध्ये केजरीवाल आणि सत्येंद्र जैन सहभागी असल्याचे पुरावे दिले. पण केजरीवाल,सत्येंद्र जैन आणि मनिष सिसोदीया गप्प बसलेत, असे मिश्रा यांनी सांगितले.