जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड
वडगाव मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघ मर्यादित सीएम चषक शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेत वळवण गावातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संघाने विजय संपादित केला. या संघाची जिल्हास्तरीय सीएम चषक कबड्डी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. त्यांच्या यशामुळे वळवळ परिसरातील नागरिकांनी, पदाधिकार्यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी या संघाचे अभिनंदन केले आहे. हे मोठे यश संघाला मिळाले आहे. त्यामुळे सी एम चषकाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. आता या स्पर्धेमध्येही ते गावाचे नाव मोठे करतील, हे नक्की.
तालुक्यातील 25 मुलांचे व 5 मुलींचे संघ सहभागी
या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील 25 मुलांचे व 5 मुलींचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, देवीदास कडु , नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, रचनाताई सिनकर, मावळ भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, युवा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, अर्जुन पाठारे, संभाजी येवले हे उपस्थित होते. सीएम चषक कबड्डी स्पर्धेच संयोजन भाजयुमोचे मावळ कार्याध्यक्ष अरुण लाड यांनी केले होते. कबड्डी स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, द्वितीय हनुमान स्पोर्टस् क्लब, तृतीय जय मल्हार कबड्डी संघ तर चतुर्थ क्रमांक मयुरदादा स्पोर्टस् फाउंडेशन यांचा आला.