वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांचे नही प्राधिकरणाला निवेदन
भुसावळ- वरणगाव शहराच्या बाहेरून नवीन महामार्गाचे काम सुरू असून त्यात मध्यभागीच वरणगाव आयुध निर्मानीकडे जाण्यासाठी तसेच मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानकडे जाणारा रस्ता सुद्धा बंद होणार असल्याने यातून सुवर्णमध्य मार्ग काढण्यासाठी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नहींचे प्रकल्प संचालक सिन्हा, समन्वयक अरुण सोनवणे, नहींचे चेअरमन चेतराम, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, शेख सईद आदींच्या उपस्थितीत बैठक घेणयात आली. प्रसंगी काळे यांनी मोरी तयार केल्यास नागरीकांसह पाईप लाईनचाही प्रश्न सुटणार असल्याचे अधिकार्यांना सांगितले.
दिल्लीत प्रस्ताव मंजुरीसाठी जाणार
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक सुधीर देऊळगावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. कब्रस्थानकडे जाणार्या रस्त्यावर मोरी केल्यास वरणगाव शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन सुद्धा महामार्गाच्या रस्त्याखाली दबल्याने हा प्रश्नदेखील सुटणार असल्याचे सांगण्यात आले तसेच याबाबतचा प्रस्ताव प्रकल्प संचालक सिन्हा यांनी तत्काळ दिल्ली मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, असे उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी प्रशासनालाही निवेदन
जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचीही नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, नगरसेविका माला मेढे यांनी भेट घेवून निवेदन दिले तसेच जिल्हाधिकार्यांनी तत्काळ लक्ष घालून जनहिताची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी प्रकल्प संचालक यांना प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले तसेच मुख्यधिकारी बबन तडवी यांना प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे आदेश दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.