भुसावळातील प्रकार ; गॅस एजन्सीच्या कर्मचार्याविरुद्ध गुन्हा
भुसावळ- कमर्शियल गॅस हंडीचा एका गॅस एजन्सीला भाडे तत्वावर लावलेल्या रीक्षात अनधिकृतरीत्या वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेने कारवाई करीत रीक्षा चालकासह वाहन ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या कारवाईने गॅस एजन्सीच्या वाहन चालक कर्मचार्यांसह अनधिकृतरीत्या गॅसचा वापर करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहर वाहतूक शाखेसह स्थानिक पोलिसांनी शहरातील अवैधरीत्या गॅस चालणार्या वाहनांचा शोध घेवून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त हेात आहे.
शहर पोलिसांच्या सतर्कतेने कारवाई
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हंबर्डीकर चौकात वाहतूक कर्मचारी त्र्यंबक बाविस्कर व संदीप ठाकरे हे कर्तव्यावर असताना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास रीक्षा (क्रमांक एम.एच.19 एम.0418) या रीक्षाला कमर्शियल सिलिंडरद्वारे गॅसचा वापर होत असल्याचे आढळल्याने कर्मचार्यांनी वाहन अडवल्यानंतर खातरजमा केली असता अवैधरीत्या गॅस जोडणी केल्याचे आढळल्यानंतर शहर पोलिसात रीक्षा जमा करण्यात आली तर रीक्षा चालक रवी मन्साराम टाक (39, वसंत टॉकीजमागे, भुसावळ) यास अटक करून त्याच्याविरुद्ध संदीप ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून 80 हजार रुपये किंमतीची रीक्षा, तीन हजार 500 रुपये किंमतीची गॅस हंडी जप्त करण्यात आली.
गॅस एजन्सी चालकांवरही व्हावी कारवाई
शहरातील विविध गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांना घरपोच सिलिंडरची डिलिव्हरी होते मात्र या रीक्षांना अवैधरीत्या गॅस सिलिंडरद्वारे इंधन पुरवठा केला जात असल्याने अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. गुरुवारी वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली रीक्षा एका गॅस एजन्सीची असून ती भाडे तत्वावर लावण्यात आल्याचे समजते. अवैध प्रकारांना खतपाणी घालणार्या गॅस एजन्सी चालकांनाही या प्रकारासाठी दोषी मानुन सहआरोपी करावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरीकातून व्यक्त होत आहे तर बसस्थानकासह शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनांमध्येही अवैधरीत्या गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याने धडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाहतूक पोलिस धडक मोहिम राबवणार
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले की, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात धडक मोहिम राबवून अवैधरीत्या सिलिंडरचा वापर करणार्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई केली जाईल शिवाय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांची शुक्रवारपासून तपासणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.