कमला मिल आगप्रकरणी अधिकाऱ्यांनाही आरोपी करा

0

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली फौजदारी रिट याचिका

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील भीषण आगीप्रकरणी ‘वन अबव्ह’ व ‘मोजोस बिस्ट्रो’ या दोन्ही पबच्या मालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आणि अनेकांना अटकही झाली. मात्र, या घटनेसाठी मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारीही तितकेच कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही गुन्हे नोंदवून त्यांना आरोपी करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच पालिकेच्या जी-दक्षिण वॉर्डमधील आजी-माजी अधिकाऱ्यांच्या भूमिकेची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी एक फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

कमला मिल आगी प्रकरणी यापूर्वी चार जनहित याचिका करण्यात आलेल्या आहेत. ही पाचवी याचिका असून त्यात प्रामुख्याने आगीच्या घटनेसाठी जबाबदार असलेल्या पालिका अधिकाऱ्यांविरुद्धही एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. लॉचे शिक्षण घेत असलेल्या परमेश्वर पांडे (२५) या विद्यार्थ्याने अॅड. सनी पुनमिया यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. ‘कमला मिल कम्पाऊंडमध्ये मीही नेहमी जातो. त्या घटनेत मीही बळी ठरू शकलो असतो. आताही भीती वाटते. लोअर परळ किंवा मुंबईतील अन्य भागांतील बेकायदा बांधकामांना अप्रत्यक्षपणे अभय देण्याची पालिका अधिकाऱ्यांची प्रवृत्ती घातक आहे. त्यामुळे त्या चिंतेपोटी ही याचिका करत आहे’, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अॅड. पुनमिया यांनी याविषयीची प्राथमिक माहिती नुकतीच प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामानी यांच्या खंडपीठाला दिली. त्यावेळी याप्रश्नी यापूर्वीच सादर झालेल्या माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्या याचिकेसह अन्य याचिकांसोबत ही याचिकाही सुनावणीसाठी ठेवली. त्यानुसार, या सर्व संबंधित याचिका सोमवारी न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला येण्याची शक्यता आहे.