कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली का?

0

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. देशातल्या जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढते त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली आहे का, याचा अभ्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) केला जाणार आहे.

सिवियर ऍक्युट रेस्पिरेटरी इलनेस (एसएआरआय) म्हणजेच श्वासोच्छवास घेताना येणार्‍या समस्या आणि इन्फ्लुएंजासारख्या आजारांचा (आयएलआय) सामना करणार्‍या प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान २५० जणांच्या तपासण्या करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सगळ्या राज्यांना दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नजर ठेवण्यासाठी मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.

या ७५ जिल्ह्यांमध्ये ईएलआयएसए (एंजाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट असे) टेस्ट किट्सच्या माध्यमातून चाचण्या घेऊन त्यातून मिळणार्‍या आकडेवारीचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जाणार आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाले आहे का, ते तपासण्यासाठी आयसीएमआरने मार्चमध्येही अशाच प्रकारे आढावा घेतला होता. देशात कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचे पुरेसे पुरावे नसल्याचे आयसीएमआरने आतापर्यंत अनेकदा म्हटले आहे.