करंदीत बिबट्याचा वावर; ग्रामस्थ भयभीत

0

शिक्रापूर । चाकण-शिक्रापूर रस्त्यावर मागील आठवड्यात एका बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच करंदी येथे ऊसतोड कामगारांना सोमवारी बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बिबट्याचा वावर असल्याचे यावरून स्पष्ट झाले.

अंकुश नप्ते यांच्या शेतामध्ये ऊस तोड सुरू असताना कामगारांना बिबट्या दिसला. त्यामुळे त्यांनी काम बंद केले. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्याला कळविण्यात आले होते. पोलिस नाईक संदीप जगदाळे व उमेश जगताप यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर वनविभागाच्या वनरक्षक सोनल राठोड, सर्पमित्र गणेश टिळेकर, माऊली दरेकर, कैलास नप्ते आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कामगारांनी बिबट्या व त्याच्या काही पिल्लांचा देखील आवज येत असल्याचे सांगितले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तेथे पाहणी केली. परंतु कोठेही बिबट्या अथवा त्याची पिल्ले आढळून आली नाही. सर्व तपासणी केल्यानंतर सोनल राठोड यांनी बिबट्या नसल्याचे सांगितले. त्यांनतर तेथे फटाके वाजविण्याचे आणि शेतकर्‍यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या ठिकाणची पुन्हा पाहणी करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. परंतु भयभीत झालेल्या ऊसतोड कामगारांनी ऊस तोडण्यास नकार दिला व तेथील ऊसाचे शेत सोडण्याचा निर्णय घेतला. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.