ऊत्तर प्रदेश : करवाचौथच्या दिवशीच पत्नीने छळाला कंटाळून पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कविता सैनी (वय ४५) या महिलेला अटक केली असून संशय येऊ नये म्हणून तिने करवाचौथला उपवास देखील केला.
मेरठमध्ये राहणाऱ्या कविता सैनीचा विवाह सुंदरपाल याच्याशी झाला होता. सुंदरपाल हा पत्नी आणि मुलगा कुलदीपला दररोज मारहाण करायचा. यामुळे कविता कंटाळल्या होत्या. आठ वर्षांपूर्वी सुंदरपालने किरकोळ भांडणातून स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या देखील केली होती. मुलीने आत्महत्या केल्याचे त्याने सर्वांना सांगितले होते. मात्र, पतीच्या भीतीमुळे कुटुंबातील एकाही सदस्याने याची पोलिसांकडे तक्रार केली नाही. यामुळे कविताच्या मनात पतीविषयी राग होता. या रागातूनच तिने पतीच्या हत्येचा कट रचला. यात तिने मुलगा कुलदीप आणि घरात काम करणाऱ्या शाद्री याची मदत घेण्याचे ठरवले.