कर्जतमध्ये माफियांना दणका

0

कर्जत । कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवरील बोरगाव भागात कर्जत महसुल विभागाच्या अंतर्गत येणार्‍या मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. एक ब्रास रेती व जेसीबी आणि ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून रेतीसह जेसीबी आणि ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे. कळंब येथील मंडळ अधिकारी जगन्नाथ उबाळे यांनी ही कारवाई केली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी चोरटी वाळूउपसा होत असून आता महसूल विभागाने यावर पायबंद घालण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून यासारख्या कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोशीर नदीवरील बोरगाव भागात नदीपात्रात वाळू उपसा करत असताना धाड टाकली असता तेथे जेसीबीच्या सहायाने वाळू उपसा करत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी ही कारवाई केली. तसेच नदीपात्रात रेती आढळून आल्याने त्यांच्यावरही कारवाई करून जेसीबी आणि ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. ही कारवाई केल्याने अनेक वाळू उपसा करणार्‍याचे धाबे दणाणले आहेत. कर्जत तालुक्यात अशा अनेक भागात वाळू उपसा होत असून तशा प्रकारे मात्र कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी पात्राची धूप होवून अनेक नदी पुलांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने अशा वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करून पुलांना धोका निर्णाण होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

विविध सामुग्री हस्तगत
यासंदर्भात कळंब येथील तलाठी, मंडळ अधिकारी जगन्नाथ उबाळे यांच्याशी अनेकवेळा संपर्क करूनही संपर्क होवू शकलेला नसल्याने कर्जतचे नायब तहसिलदार एल.के.खटके यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बोरगाव येथील नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली असून एक ब्रास रेतीसह जेसीबी आणि ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.