कर्जत । कर्जत तालुक्यात आजही जैवविविधता टिकून आहे. नामशेष होत चाललेले अनेक दुर्मीळ वन्यजीव येथील जंगलात सापडत आहेत. या अगोदरही असेच वन्यजीव येथील प्राणिमित्र व सर्पमित्रांना सापडले होते. 21 नोव्हेंबर रोजी कर्जतमधील शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर काही कामगारांना वाळासारखा दिसणारा एक छोटासा साप दिसला. दहा ते बारा इंच असल्यामुळे त्या कामगारांनी तो साप एका छोट्याशा बरणीमध्ये पकडला व स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधला. नंदकुमार तांडेल, आशिष वर्मा, ओंकार खाडे या सर्पमित्रांनी तो साप आपल्या ताब्यात घेतल्यावर त्यांच्या लगेच लक्षात आले की हा वाळा जातीचा साप नसून दुर्मीळ पोवळा जातीचा विषारी साप आहे.
दात छोटे असल्याने दंश होण्याची शक्यता कमी
सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या परिसरामध्ये आढळणार्या सापांच्या जातींपैकी चार प्रमुख जाती या विषारी जातींच्या आहेत. यामध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे, हे आहेत. परंतु, पोवळा सापही विषारी असून मानवी वस्तीत आढळत नसल्याने शिवाय आकाराने लहान असल्याने मनुष्याला सहजा सहजी दंश केल्याच्या घटना घडत नाही. मात्र, तो दंश झाल्यास धोकादायक असल्याची माहीती सर्पमित्रसांनी यावेळी दिली. दात छोटे असल्याने मनुष्याला त्याचा दंश सहजासहजी होत नाही.
सर्पमित्रांनी दिले जीवदान
या सापाचे विष मज्जा संस्थेवर असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चावलेला भागात यातना होतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. मात्र, आकाराने लहान असल्याने हा साप अन्य प्राण्यांच्या भक्ष स्थानी पडतो. वन्य जीव संरक्षण कायदा अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत शेड्युल (2) मध्ये समाविष्ट आहे. हा साप सर्प मित्रांनी वन परिमंडळ अधिकारी संजय तांबे आणि अधिकारी शेख आणि कमलाकर मांडे यांच्या उपस्थित पंचनामा करून जंगलात सोडून त्याला जीवदान दिले.