जळगाव । कर्जबाजारी झाल्याने 45 वर्षीय प्रोढाने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रेल्वेलाईनवर घडली. राजेंद्र सिताराम सोनवणे (रा. हरिविठ्ठलनगर, मु.रा.आसोदा) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, मयताजवळून पोलिसांना सुसाईड नोट मिळून आली आहे. याप्रकरणी स्टेशन उपप्रबंधक यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र सोनवणे हरिविठ्ठलनगरात कुटूंबियांसह वास्तव्यास होते. फर्निचरचे काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. मंगळवारी सकाळी राजेंद्र सोनवणे हे घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास हरीविठ्ठल नगर परिसरातीलच जळगाव-शिरसोली डाऊन रेल्वेलाईनवरील खांबा क्रं.416/23/25 दरम्यान धावत्या रेल्वेखाली त्यांनी स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. स्टेशन उपप्रबंधक यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी धाव घेत घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यानंतर त्यांची ओळख पटविली. अंगझडती घेतली असता त्यात सुसाईड नोट आढळुन आली. त्यात राजेंद्र सोनवणे यांनी कर्जबाजारी झाले असल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यात लिहीलेले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. सायंकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी नातेवाईकांची रूग्णालयात एकच गर्दी केली होती. राजेंद्र सोनवणे यांच्या प्रश्चात आई, पत्नी सिमा, मुलगा रोहन, मुलगी सोनल असा परिवार होता. गेल्या दोन वर्षापासून सोनवणे हे हरिविठ्ठल नगरात राहत होते. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास शिंदे हे करीत आहेत.