कर्जबाजारी शेतकर्‍याची विष प्राशन करून आत्महत्या

0

जळगाव। सरकार कर्जाबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने मी कर्जातून मुक्त होवू शकत नाही, त्यामुळे मीच जीवनातून मुक्त होतो असे सांगून महेश सूर्यकांत चौधरी (वय-40) या तरुण शेतकर्‍याने मध्यरात्री विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील भादली बु.ता.जळगाव येथे घडली. आत्महत्येपूर्वी महेश यांनी बुधवारी रात्री घराजवळील वाड्यात गल्लीतील नागरिक व मित्रांजवळ सरकारविषयी प्रचंड रोष व्यक्त केला.

सरकार विरोधात व्यक्त केला रोष
भादली बु. येथील महेश चौधरी यांच्याकडे स्वत:चे साडे तीन बिघे शेती आहे तर काही शेती कराराने करतात. परंतू सतत नापिक किंवा दुष्काळ यामुळे चौधरी यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता, शिवाय आताही दुबार पेरणीचे संकट डोळ्यासमोर होते. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे 60 हजार व खासगी असे दोन ते तीन लाखाचे कर्ज त्यांच्यावर होते. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला, मात्र त्याचे निकष व ठोस निर्णय नसल्याने कर्जमाफी मिळण्याची शक्यता नसल्याचे गृहीत धरुन सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व रोष व्यक्त करुन चौधरी यांनी मध्यरात्री एक वाजता सासर्‍यांच्या म्हशीचा गोठा गाठला. तेथून फवारणीची औषध घेत बाहेर रस्त्याच्या कडेला असलेली विजेच्या पोलवर जावून तेथे विष प्राशन केले.

घर केले बंद…
याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.महेश यांनी बाहेर गल्लीत मित्रांजवळ आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. तेथून घरी आल्यानंतरही त्यांची सरकारच्या विरोधात व कर्जाच्याबाबतीच चिडचिड सुरुच होती. आत्महत्येचे भीतीने पत्नी भावना यांनी रात्री झोपताना घराला कुलुप लावून त्याची चावी स्वत:जवळच ठेवली होती. मात्र रात्री साडे बारा वाजता उठून महेश यांनी लघवीला जाण्याच्या बहाण्याने चावी घेत घराच्या बाहेर जावून आत्महत्या केली.