कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ५० लाखाच्या आतच राहणार!

0

३१ मार्चपर्यंत ४६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकांकडे जमा

मुंबई (निलेश झालटे) :– राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल अशी घोषणा सरकारने कर्जमाफी योजना जाहीर करताना केली होती. शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत राज्य सराकरने ३१ मार्चपर्यंत ४६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकांकडे जमा केली आहे. यातील प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३७ लाख असून त्यांच्या खात्यात आतापर्यंत १४ हजार ७०० कोटी रुपये जमा झाले आहेत.

सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली असून ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली ही मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर वन टाइम सेटलमेंटची मुदतही सरकारने ३० जूनपर्यंत वाढवली आहे. मात्र ही मुदत वाढवूनही जास्त शेतकऱ्यांचे अर्ज येण्याची शक्यता कमी असल्याचे सहकार खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन सरकारने शेतकऱ्यांना केले होते. त्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. परंतु, ही मुदत १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले असून आता वाढीव मुदतीत जास्त अर्ज येण्याची शक्यता कमी असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत, १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली होती. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले होते.