चाळीसगाव । राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून दिड लाखाचा आत कर्जाची रक्कम माफ होऊन त्याचा फायदा शेतकर्यांना झाला, असे मुख्यमंत्र्यांनी घोषीत केले असले तरी चाळीसगाव तालुक्यात 34 हजार 208 शेतकर्यांपैकी फक्त 8 हजार 720 शेतकर्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून देखील विकासो सचिव कर्जाच्या 5 माहिन्याच्या व्याजाची रक्कम वसुलीसाठी तगादा लावत असल्याने कर्ज माफी झाली असतांना व्याजाची रक्कम का द्यावी असा सवाल शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून कर्जमाफीचा विषय चांगलाच गाजत असून आता हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा मद्दा सुद्धा गाजत असातांना इकडे विकासोतर्फे व्याजाची वसुल सुरू आहे.
तगादाने शेतकरी मात्र संभ्रमावस्थेत
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील 34 हजार 208 शेतकरी या योजनेस पात्र आहे. त्यापैकी 8 हजार 720 शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्याला 48 कोटी 17 लाख 46 हजार 385 रूपये 8 हजार 720 शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. उर्वरित शेतकर्यांच्या खात्यावर अद्यापावेतो ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे 70 टक्क्यांच्यावर शेतकर्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नसतांना विकासोचे सचिव ज्या शेतकर्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. त्यांच्याकउे जुलैपासून ते डिसेंबरमहिन्यापर्यंत व्याजाची रकमेसाठी तगादा लावत असल्याने शेतकरी मात्र संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी अजून प्रतिक्षेत
आगोदरच कमी पाऊस त्यात कमी उत्पादन झाल्याने ऐण उत्पादन काढण्याच्या वेळस अवकाळी पाऊस आल्याने उत्पन्नात घट आली. त्यात बोंडआळीने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आगोदरच संकटात सापडलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळाला असला तरी विकासो सोसायटीकडून कर्जाच्या रकमेवरील व्याजाच्या वसुलीचा तगादा लावला जात असल्याने त्यांच्या संकटात अजून भर पडल्याने चिन्ह दिसत आहे. प्रमाणापेक्षा कमी उत्पादन निसर्गाचा कोप, बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि हे सर्व सोडल्यानंतर हाता तोंडाशी आलेला घास व त्यात बिबट्याची दहशत यामुळे शेतकरी पुर्ण खचला असून शासनाने कर्जमाफी रूपाने सहाय्यता केली असली तरी चाळीसगाव तालुक्यात 30 टक्के रक्कम जमा झाल्याने इतर पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
माझ्याकडे विकासोचे 66 हजार रूपये कर्ज होते. ती कर्जमाफी झाली असल्याचे मला सांगण्यात आले मात्र तशी रक्कम माझ्या खात्यावर आली नाही व सचिव त्या कर्जाच्या रकमेचा व्याजासाठी चकरा मारत आहे. कर्जमाफी झाली असेल तर व्याजाची रक्कम कश्याची घ्यायची.
-सुनिल श्रावण पवार
शेतकरी, न्हावे ता.चाळीसगाव
निसर्गाच्या लहरीपणामुळे हाता तोंडाशी आलेल्या उत्पन्नात घट झाली असून त्यात शासनाने जाहिर केलेली कर्जाची रक्क आजूनही खात्यात आली नाही. तरीही विकासो सचिव कर्जाच्या रकमेसाठी तगादा लावत आहे. उत्पन्नच नसल्याने खिश्यात पैसे नाही. ती रक्कम मी भरू शकत नाही
– शिवदास अर्जून पाटील
शेतकरी, चिंचखेडे ता.चाळीसगाव
सोसायटीचे कर्ज माफ झाले आहे. असे असतांना अद्याप माझ्या खातेवर कर्जमाफीची रक्कम आली नाही व एक टक्का व्याजाची आकारणी करण्यासंदर्भात सांगितले आहे की माफी झाल्यावर व्याजाची आकारणी का करत आहे. याचे कोडे अजून समजू शकत नाही.
– अरूण बेणीराम पगारे
शेतकरी, न्हावे ता.चाळीसगाव
जिल्हा उपनिबधक यांचे पत्र आम्हाला प्राप्त झाले असुन त्यात स्पष्ट म्हटले आहे की, शासनाने ज्या शेतकर्यांचे कर्ज माफ केले आहे. परंतु ऑगस्ट ते डिसेंबर या 5 महिन्याची व्याजाची आकारणी करावी असे आदेश असल्याने तालुक्यातील शेतकर्यांकडील व्याजाची रक्कम आकारणी वि.का.सो. सचिव यांच्या मार्फत सुरू आहे.
– रामचंद्र पाटील
सहाय्यक गटसचिव, विकासो ता. चाळीसगाव
माझ्यावर सोसायटीचे 65 हजार रूपये कर्ज असून ते शासनाने माफ केले असतांना विकासोचे सचिव माझ्याकडे कर्जाच्या रकमेवर जवळपास 5 महिन्यांचे 4 हजार 700 रूपये व्याजाची रकमेची मागणी करत आहे. सर्वसामान्य शेतकरी निसर्गाच्या अवकृपा झाली असल्याने उत्पन्नच पदरा पडले नाही त्यामुळे पैसे भरणे कठीण झाले आहे.
– हर्षल माधवराव पाटील
शेतकरी, तमगव्हाण ता. चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यात एकूण 34 हजार 208 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. मात्र आजपर्यंत शासनाकडून 8 हजार 720 शेतकर्यांना कर्ज माफीची रक्कम 48 कोटी 17 लाख 46 हजार 385 रुपये प्राप्त झाले आहेत.
– व्ही.एम.जगताप
सह. निबंधक सहकारी संस्था, चाळीसगाव