कर्जाच्या परतफेडीसाठी मुंबई, दिल्लीत बैठक

0

जळगाव । हुडको कर्जाची एकरकमी परतफेड करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये 30 रोजी मुंबई येथे तर 31 रोजी दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी आयुक्त जीवन सोनवणे मुंबईला रवाना झाले आहेत. तत्कालीन जळगाव नपाने घरकुलसह विविध योजनांसाठी हुडकोकडून 141 कोटी 32 लाखाचे कर्ज घेतले होते. परंतु मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने काही हप्ते थकले होते. त्यानंतर हुडकोने डीआरटीत धाव घेवून याचिका दाखल केली होती.

पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
याप्रकरणी डीआरटीने 341 कोटीची डिक्री नोटीस बजावली होती. तसेच तब्बल 50 दिवस मनपाचे सर्व बँक खाते गोठविण्यात आले होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालय डीआरटीच्या डीक्री नोटीसला स्थगिती देवून मनपा प्रशासन हुडको आणि शासन यांनी बैठक घेवून तोडगा काढावा, अशी सुचना केली होती. हुडकोकडून 141 कोटी 32 लाखाचे कर्ज घेतले असले तरी आतापर्यंत मनपाने कर्जापोटी 297 कोटी अदा केले आहेत. दरम्यान, आठ दिवसापूर्वी आयुक्त जीवन सोनवणे यांनी मुंबईला जावून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून कर्जाबाबत तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार ना.चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने उद्या दि.30 रोजी मुंबई येथे नगरविकास सचिव, हुडकोचे प्रतिनिधी आणि आयुक्तांची प्राथमिक बैठक होणार आहे. त्यानंतर दि.31 रोजी दिल्ली येथे बैठक होणार आहे. दिल्ली येथे होणार्‍या बैठकीसाठी आयुक्तांसह मंत्रालयातील अधिकारी आणि हुडकोचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.