कर्जाला कंटाळून कळमसरे गावातील शेतकर्‍याची आत्महत्या

अमळनेर : तालुक्यातील कळमसरे येथील 65 वर्षीय वृध्दाने शेतातील सततची नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. ही घटना मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विष्णू रामदास चौधरी (65, रा.कळमसरे, ता.अमळनेर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

पीठ गिरणी स्टोअर रूममध्ये आत्महत्या
विष्णू चौधरी हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्यास होते. मंगळवार. 8 फेब्रुवारी रोजी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून सर्वांची विष्णू चौधरी यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेतातील सततच्या नापीकी आणि डोक्यावर तीन लाखांचे कर्ज या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांकडून समजते. मयत शेतकर्‍याच्या पत्नी, मुलगा, सुन असा परीवार आहे. दरम्यान, या प्रकरणी देविदास चौधरी यांच्या खबरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुनील तेली करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा भाऊ नथ्थू चौधरी, मुलगा विकास, सुन नातवंडे व तीन मुली असा परीवार आहे.