कर्ज फेडण्यासाठी अपहरणाचा बनाव

0

भोसरी : कर्ज फेडण्यासाठी आणि मेहुण्याकडून पैसे उकळण्यासाठी त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. स्वतःच्या पत्नीकडेच त्याने मित्राच्या मोबाइलवरून फोन करून पाच लाख रुपयांची खंडणीही मागितली. अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत या घटनेचा भांडाफोड केला. ही घटना मंगळवारी सकाळी भोसरी येथे घडली. विठ्ठल वाबळे असे अपहरणाचा बनाव रचलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सीमा वाबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल वाबळे मंगळवारी सकाळी त्यांच्या गवळीनगर, भोसरी येथील प्लेसमेंटच्या टाटा ऑटो कन्सल्टन्सी या क ार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी आपल्या पतीचे अपहरण झाल्याची फिर्याद सीमा यांनी दिली. तसेच खंडणीखोरांनी पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. अपहरण झाल्याची माहिती मिळताच भोसरी पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक यांनी समांतर तपासला सुरूवात केली. अपहरण झालेली व्यक्ती स्वारगेट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्री उशिरा कारवाई करत विठ्ठल वाबळे यांची सुटका केली. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये वाबळे यांनी आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे पोलिसांना सांगितले. भोसरी पोलीस आता वाबळे यांच्या मित्राचा शोध घेत आहेत.