जळगाव । यावेळी पावसाळा लवकर सुरु होणार असल्याचा सुतोवाच देण्यात आला असल्याने खरीप हंगामाच्या मशागतीला शेतकरी लागला आहे. लग्न सराई संपत आल्याने शेतकर्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. आधुनिक काळात शेतीची सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने शेतकर्यांला मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मात्र शेतकर्यांना कर्ज मिळत नसल्याने मशागत करण्यासाठी शेतकर्यांना आर्थिक चणचण भासत आहे. जिल्हा बँक मे महिना संपत आला असतांनाही कर्ज वितरीत करत नसल्याने शेती मशागत कशी करावी असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. खरीप हंगामासाठी नवीन कर्ज मिळावा म्हणून शेतकर्यांनी त्यांच्याकडील कर्जाची रक्कम भरली आहे. व्याजाने पैसे काढून शेतकर्यांनी या रकमेची पुतर्ता केली आहे. त्यामुळे शेतकर्याला व्याजाचा भुर्दंड बसत आहे.
हवे असलेले बियाणे मिळत नाही
तापमानाची तिव्रता कमी होण्याची शेतकरी वाटप बघत असून लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. साधारण पुढील आठवड्यात शेतकरी उन्हाळी लागवड करणार आहे. मात्र दोषी आढळल्याने 24 कापुस बियाण्यावर शासनाने बंदी घातली आहे. यात सर्वाधिक मागणी असलेली राशी 659 चा देखील समावेश आहे. कर्ज मिळत नाही म्हणून शेतकर्यांनी पदरच्या पैशाने बियाणे खरेदी करत आहे. मात्र जे बियाणे हवे आहे ते मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. बंद असलेल्या वाणाबाबत शासनाने तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गामधुन होत आहे.
कर्जाअभावी लागवड लांबणार
जिल्हा बँकेतर्फे तोकडी रोकड मिळत असल्याने सर्व शेतकर्यांना वेळेवर कर्ज मिळणार नसल्याचे चित्र आहे. साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बागायतदार शेतकर्यांकडून लागवड केली जाते. मात्र कर्जा अभावी बागायत लागवड लांबणीवर जाणार असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे.