नवी दिल्ली : भारतीय डेव्हिस चषक टेनिस संघाच्या कर्णधार पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करणे अयोग्य आहे. आनंद अमृतराज हे १९८७-८८ पासून तीन दशके सर्वोत्कृष्ट कर्णधार राहिले. त्यांच्यापेक्षा सरस कर्णधार मी तरी पाहिलेला नाही, असे मत व्यक्त दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले. विजयी कर्णधाराची उचलबांगडी हा चुकीचा पायंडा असल्याची टीका केली आहे. आनंद हे विजय यांचे लहान बंधू आहेत.
डेव्हिस चषकात स्वत: भारताचे कर्णधार राहिलेले विजय म्हणाले, ‘आनंद समर्पित व्यक्ती होते. त्यांनी देशाला जे निकाल दिले त्यावर कुणी शंका घेऊ शकत नाही.’ दोनदा विम्बल्डन आणि दोनदा अमेरिकन ओपनची उपांत्यपूर्व फेरीत धडक देणारे विजय म्हणाले, ‘मी प्रत्येक विषयात ढवळाढवळ करीत नाही. पण १९८७-८८ पासून आनंदपेक्षा सरस कुणी कर्णधार झाला नाही, इतके सांगू शकतो. तो माझा भाऊ आहे म्हणून नव्हे तर त्याचे कर्तृत्व पाहून हे वक्तव्य करीत आहे. अन्य खेळाडू त्यांच्या क्षमतेचा नाही. २० वर्षे अव्वल स्तरावर डेव्हिस चषक खेळला. काही दिग्गजांना पराभूत केले. टेनिसप्रति तो झपाटला असून फ्युचर्स, चॅलेंजर्स आणि एटीपीसारख्या २५० स्पर्धांवर तो ध्यान देत आहे.’