नवी दिल्ली : बहुचर्चित मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी अशा पाच जणांवरील मोक्का कायद्यानुसारचे गुन्हे हटविण्यात आल्याने या दोघांना या खटल्यात काहीसा दिलासा मिळाला आहे. या दोघांविरुद्ध आता केवळ भारतीय दंडविधानाच्या कलमान्वयेच खटला चालविला जाईल. त्यात खून, षडयंत्र रचने आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. या खटल्यातून श्यामलाल साहू, प्रवीण टक्कलकी आणि रामचंद्र कालसांगरा यांना निर्दोष सोडण्यात आलेले आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने हा निकाल दिला. अन्य आरोपींची आरोपमुक्त करण्याची विनंतीही न्यायालयाने फेटाळून लावली. या खटल्यातील राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दोन आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्रे कायद्याखाली खटला चालणार आहे. पुढील सुनावणी आता 15 जानेवारी 2018 रोजी होणार असून, या स्फोटातील आरोपी यापूर्वीच जामिनावर सुटलेले आहेत. त्यांच्या जामिनातही वाढ करण्यात आलेली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथील अंजुमन चौकातील शकील गूडस ट्रान्सपोर्ट कंपनीच्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले होते, तर 101 नागरिक गंभीर जखमी झाले होते. हा स्फोट एलएमएल फ्रीडम या दुचाकीत स्फोटके ठेवून घडविण्यात आला होता. याप्रकरणी मालेगाव येथील आझाद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती, त्यात खून, खुनाचा प्रयत्न, गुन्ह्याचा कट रचणे आदींसह नंतर मोक्का कायद्यानुसारही गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास नंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला होता. एटीएसने चेसीस क्रमांकाच्याआधारे तपास करून सर्वात पहिल्यांदा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक केली होती. कारण, ही दुचाकी त्यांच्या नावे नोंदविण्यात आलेली होती. त्यांच्या चौकशीतून स्वामी दयानंद पांडे, मेजर रमेश उपाध्याय आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करून एटीएसने 20 नोव्हेंबर 2008 रोजी आरोपींविरुद्ध संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) गुन्हे दाखल केले होते. तसेच, 21 जानेवारी 2009 रोजी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. त्यात 11 आरोपी अटकेत तर तीन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास नंतर अचानक राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए)कडे सोपविण्यात आला. एनआयएने जवळपास चार वर्षे तपास करून 31 मे 2016 रोजी अंतिम आरोपपत्र दाखल केले. ज्यात सेवानिवृत्त रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, कर्नल पुरोहित, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी पांडे, सुधाकर चतुर्वेदी, रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा करण्यात आला होता.
बॉम्बस्फोट खटला सुरुच राहणार!
या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह, शिवनारायण कालसांगरा, श्याम भवरलाल साहू, प्रवीण टक्कलकी, लोकेश शर्मा, धानसिंह चौधरी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, अशी बाबही एनआयएने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे रमेश उपाध्याय व अजय राहिकर यांच्यावरील मोक्का व युएपीए कायद्याचे 17,20 व 13 हे कलम हटविण्यात आले आहे. तर कालसांगरा व श्याम साहू यांना आरोपमुक्त करण्यात आले. यापूर्वी याचवर्षी एप्रिलमध्ये साध्वी प्रज्ञासिंह यांना तर ऑगस्टमध्ये कर्नल पुरोहित यांना जामीन मिळालेला होता. पुरोहित हे सुमारे नऊ वर्षे कारागृहात होते. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात विशेष मोक्का न्यायालयानेही साधी प्रज्ञासिंह, पुरोहित व अन्य आरोपींविरुद्ध चुकीच्या पद्धतीने मोक्का कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, अशी टिपण्णी केली होती. एनआयए न्यायालयानेही मोक्कातून त्यांची सुटका केली आहे. या खटल्यातून आरोपमुक्त करण्याची याचिका आरोपींनी केली होती. ती मात्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने हा खटला सुरुच राहणार आहे.