कर्नाटकच्या लोकायुक्तांना भोसकले

0

भरदिवसाचा थरार, प्रकृती चिंताजनक

बेंगळुरू : कर्नाटकाचे लोकायुक्त पी. विश्‍वनाथ शेट्टी यांना त्यांच्या कार्यालयात घुसून चाकूने भोसकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेट्टी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास तेजस शर्मा नावाच्या हल्लेखोराने लोकायुक्तांच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांच्यावर चाकूने तीन वार केले. तो टुमकुरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण?
आरोपीविरोधात लोकायुक्त कार्यालयामध्ये 18 तक्रारी दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणामध्ये लोकायुक्त शेट्टी यांनी आरोपीला चौकशीसाठी समन्स बजावला होता. चौकशीसाठी कार्यालयात दाखल झाल्यावर त्याने शेट्टी यांना चाकूने भोसकले. हा वार इतका जबरदस्त होता, की भोसकल्यानंतर चाकू मोडल्याचे पोलिसांनी सांगितले. बेंगळुरुतील गजबजलेल्या भागामध्ये लोकायुक्तांचे कार्यालय आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालयेही आहेत. लोकायुक्त कार्यालय परिसरात तेजस चाकू घेऊन कसा शिरला याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शेट्टी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही शेट्टी यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. लोकायुक्त शेट्टी आधी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती होते. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यांत त्यांनी कर्नाटकच्या लोकायुक्तपदी शपथ घेतली होती.