बंगळूर-कर्नाटकात आज स्थानिक निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. तुमकुर येथे काँग्रेसच्या विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत अज्ञात व्यक्तींनी अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कर्नाटकमध्ये महापालिका निवडणुकींची रणधुमाळी असून महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. तुमकुर येथे काँग्रेसचे उमेदवार इनायतुल्ला खान यांनी निवडणुकीत बाजी मारली. यानंतर खान यांच्या समर्थकांनी प्रभागात विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तींनी अॅसिड हल्ला केला. यात आठ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकमध्ये महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. राज्यातील २, ७०९ जागांवर ही निवडणूक पार पडली. या जागांसाठी सोमवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेस सुमारे ९५० जागांवर आघाडीवर असून काँग्रेस अव्वल स्थानी आहे. तर भाजपा दुसऱ्या स्थानी आहे.