दोन कार जप्त ; धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीच्या आवळल्या मुसक्या
धुळे- कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील बँकेत दरोडा टाकून सुमारे चार कोटी रुपयांच्या रोकडसह सोनं लूटल्याप्रकरणी धुळ्यातील रशीद शेख शफिक याला गुरुवारी रात्री म्हैसूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. अधिक चौकशीसाठी रशीदला म्हैसूर पोलिसांनी कर्नाटकात नेले आहे. गेल्या महिन्यांत कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे बँक ऑफ कर्नाटकामध्ये दरोडा पडला होता. यावेळी दरोडेखोरांनी रोकडसह सोन्यांचे दागिने लूटून फरार झाले होते. या दरोड्याच्या तपास म्हैसूर पोलिस करीत होते. चौकशी दरम्यान पोलीसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. म्हैसून पोलिसांनी अटकेतील संशयित आरोपीला पोलीस खाक्या दाखविताच त्याने बँक दरोड्यात सहभागी असलेल्या रशीद शेख शफीक (रा. अंबिका नगर, धुळे) याचे नाव सांगितले. ही माहिती मिळताच म्हैसून पोलिसांचे पथक बुधवारी धुळ्यात दाखल झाले. या पथकात एक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता. म्हैसूरच्या पथकाने धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमुख हेमंत पाटील यांना घटनेची माहिती दिली. रात्री पोलिसांनी रशीदच्या घरात छापा टाकला. यावेळी रशीद हा घरातच होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. रशीदकडे असलेली स्कार्पिओ व आय-टेंटी अशा दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी रशिदला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. कर्नाटक पोलीस रशिदला अधिक चौकशीसाठी धुळ्यातून कर्नाटकला घेवून गेले. धुळ्यात विविध पोलिस ठाण्यात रशिदविरुध्द गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.