कर्नाटक सरकारच्या कॅबिनेटमध्ये २५ मंत्र्यांचा समावेश

0

बंगळुरू – कर्नाटकात जनता दल सेक्युलर व काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी करण्यात आला. यावेळी २५ मंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला असून यामध्ये आघाडीचे २३ आमदार, एक बसपा व एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.

आघाडीतील २३ आमदारांपैकी १४ काँग्रेसचे व ९ आमदार जेडीएसचे आहेत. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राज भवन येथे आमदारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. माजी कन्नड अभिनेत्री व काँग्रेसच्या आमदार जयमाला या मंत्रिमंडळातील एकमेव महिला सदस्य आहेत.

बहुजन समाज पक्षाचे एम. महेश यांची जेडीएसशी निवडणूकपूर्व युती असल्याने त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अपक्ष आमदार आर. शंकर यांनी आघाडीला पाठिंबा दिल्याने त्यांनाही कॅबिनेट मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (जेडीएस), उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर (काँग्रेस), वरिष्ठ नेते व दोन्ही पक्षांचे आमदार उपस्थित होते.