कर्नाटक सरकार अल्पमतात?

0

बंगळूर:कर्नाटकात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत कॉंग्रेस-जेडीएसने सत्ता स्थापन केली. कमी जागा असतानाही दोलायमान स्थितीमुळे जेडीएसला मुख्यमंत्रीपद मिळाले. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र सरकार स्थापनेपासूनची स्थिती दोलायमानच राहिली आहे.आता कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस सरकार संकटात सापडले आहे. शनिवारी सत्ताधारी काँग्रेसच्या ८ आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यात सत्तारूढ काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या १३ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केलेत. त्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे.

राजीनामे स्वीकारल्यास आघाडीचे संख्याबळ १०३वर खाली येईल. त्यामुळे काँग्रेसचे ६९ व जनता दलाचे ३४ सदस्य राहतील. दरम्यान, शनिवारी राजीनामा देण्याऱ्या आमदारांपैकी १० आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील २८ पैकी २६ जागा भाजपने जिंकल्यानंतर राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्य सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार यांनी शनिवारी आमदारांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. शिवकुमार हे सरकारचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. अध्यक्षांकडे राजीनामे दिल्यानंतर आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली.