जळगाव । महापालिकेत तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष एकाच विभागात झालेल्या कर्मचार्यांची अंतर्गत बदली करण्यात येत आहे. नगररचना, पाणीपुरवठा व बांधकाम विभागातील 11 अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या 26 मे ला आयुक्तांनी केल्या होत्या. यात नगररचनातील तीन अभियंत्यांची पाणीपुरवठा व बांधकाम विभागात तर या विभागातील अभियंत्यांची नगररचना विभागात बदली केली होती. परंतू नगररचना विभागात बदली झालेले अभियंते दिलेल्या पदावर रुजू झालेले नाही.
नगररचनात येण्यास अधिकार्यांची दिरंगाई
त्यामुळे नगररचनातील बदली झालेल्या अभियंत्यांना हा पदभार सोडता येत नसल्याने कामकाज करण्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रकाश पाटील यांची बांधकाम विभागातून नगररचना विभाग, दिनेश चौधरी यांची बांधकाम विभागातून नगररचना विभाग, अविनाश कोल्हे यांची पाणीपुरवठा विभागातून नगररचना विभाग, आय.ए.शेख यांची नगररचना विभागातून पाणीपुरवठा विभाग तर समीर बोरोले, विजय मराठे यांची नगररचना विभागातून बांधकाम विभागात बदली केली. परंतू बदली नगररचना बदली झालेले अभियंते दिलेल्या पदावर अद्याप रुजू झालेले नाही. नगररचनातून बदली झालेले अभियंते श्री. शेख, श्री. मराठे, श्री. बोरोले यांना दिलेल्या विभागात पदभार स्विकारायचा आहे. पण नगररचनातील पदभार स्विकारण्यास दुसरे अधिकारी येत नसल्याने तो पदभार सोडता येत नाही आहे. त्यामुळे नगरचनातील अनेक फाईलींचे काम पेंडीग पडलेले आहे. याबाबत शहर अभियंता सुनील भोळे यांची आज या तिन्ही अभियंत्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली अडचण भोळे यांना सांगितली.