कर्मचार्‍यांची अपघात विमा योजना बारगडली

0

भुसावळ। भुसावळ नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व नागरिकांसाठी एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबाला अपघात विमा योजनेंतर्गत विमा निधी 25 हजार रुपये मिळत असे. परंतू गेल्या 6 वर्षांपासून सदर विमा योजना स्किम संपूर्णपणे कोलमडली असून शहरातील नागरिक या योजनेपासून वंचित झाले आहे. अपघातात बरेचदा एखाद्या गरीब घरातील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होतो. अश्या वेळेस त्या कुटुंबाला प्रसंगी अंत्यविधी पूर्णकरण्यासाठी सुद्धा अनेक अडचनीना सामोरे जावे लागते. यासाठी गेल्या 5 वर्षांपूर्वी पालिकेने नागरिकांसाठी हि योजना लागू केली होती.

हप्ते वेळेवर न भरल्यामुळे योजना पडली बंद
या योजनेमुळे त्या कुटुंबाला थोडातरी आधार मिळत होता. मात्र आता कित्येक वर्षांपासून ही योजना बंद झाल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचा जणू आधार कोसळला आहे असे चित्र काही अपघातग्रस्त कुटुंबांवर आल्याचे दिसून येत आहे.भुसावळ शहर मतदार संघातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तिचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला अपघाती विमा योजने अंतर्गत 25 हजार रुपये निधी मिळत होता. एवढेच नाही तर अंत्यविधीसाठी लागणारे सरपण सुद्धा पालिकेतर्फे मिळत होते. या योजनेचा शहरातील अनेक अपघातग्रस्त कुटुंबातील व्यक्तीना लाभ मिळाला. पालिका हक्काने नागरिकांकडून घर पाणी यासह शिक्षण कर, वृक्ष कर, रस्ते वीज लाईट यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा कर वसूल करते परंतु या बदल्यात नागरिकांना आवश्यक अशा सोई सुविधा पालिका देत नाही. याउलट अपघाती विमा योजना सुद्धा पालिकेने हप्ते न भरल्यामुळे बंद पडली आहे. सदर योजनेमुळे अनेक गरजू व गरीब कुटुंबाना एकप्रकारे मदतच होत होती मात्र हि योजना पालिकेने विमा हप्ते न भरल्यामुळे बंद पडली आहे. तरी पालिकेतील संबंधित अधिकार्‍यांनी याबाबीचा गंभीर विचार करून हप्ते भरण्याची तरतूद करावी तसेच मयत नागरिकाच्या अंत्यविधीसाठी लागणारे सरपणाची सोई पुन्हा करावी अशी मागणी कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. पालिका प्रशासनाने या बाबीकडे लवकरात लवकर लक्ष केंद्रित करावे, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.