कर्मयोगीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून गाळपाचे उद्दिष्ट साध्य होणार

0

हर्षवर्धन पाटील यांचा विश्‍वास

2100 रुपयांचा पहिला हप्ता उत्पादकांच्या खात्यात जमा

इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम 2018-19 मध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी पहिल्या पंधरवड्याच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 2100 रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर शुक्रवारी जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी दिली. गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून गाळपाचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होणार आहे. अंतिम ऊस दराच्या बाबतीतही आपण इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये आज अखेर 4 लाख 10 हजार मॅट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले असून 4 लाख 35 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे व सरासरी साखर उतारा 10.63 टक्के आहे. कारखान्याची ऊस तोडणी प्रोग्रॅम प्रमाणे सुरू आहे.

कारखान्याने या हंगामामध्ये 12 लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवलेले आहे. हे उदिष्ट साध्य करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी आपला सर सर्व ऊस कर्मयोगीलाच गाळपास देण्याचे आवाहन त्यांनी केले. गाळपाचे व इतर उत्पादनांचे उदिष्ट यशस्वीपणे साध्य करण्यासाठी सर्वांच्या योगदानाची आवश्यकता आहे. ऊस गाळपाबरोबरच डिस्टीलरीचेही उत्पादन तसेच सहवीज निर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू असून प्रतिदिन 2 लाख युनिटस् वीज निर्मितीचा उच्चांक करून महावितरण कंपनीला निर्यात केलेली आहे. तसेच कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ऊसाचे एकरी उत्पादन मिळण्यासाठी व जमिनीचा पोत सुधारण्याचेही आवाहन त्यांनी केले. त्यासाठी सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करावा, असे पाटील यांनी सांगितले.यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, रमेशराव जाधव, यशवंत आदी उपस्थित होते.

विक्रमी उत्पादनासाठी प्रयत्न

कर्मयोगी कार्यक्षेत्रातील सभासदांचे पूर्ण सहकार्य व योगदान असावे, कर्मयोगीची पहिली उचल 2100 रुपये जाहीर करण्यात आली. कारखान्याचे दैनंदिन गाळपामध्ये सातत्य चालूच आहे. आसवणी व सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पाण्याअभावी व हुमणीग्रस्त ऊसाच्या गाळपास कर्मयोगी कारखान्याचे यंदा प्राधान्य आहे. संचालक मंडळ, कामगार, अधिकारी, तोडणी यंत्रणा व सभासद यांचा समन्वय व विक्रमी उत्पादनासाठी प्रयत्नांची पराकाष्टा असून, ऊस तोडणी कामगार व वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे कर्मयोगी याच सर्वांच्या सहकार्याने अखंडपणे चालू आहे.