बळसाणे । बळसाणे ते दोंडाईचा मार्गावरील कर्ले घाट वाहतूकीसाठी धोकादायक ठरत आहे. या घाटातील संरक्षक कठड्याची दुरावस्था झाली असून, कठड्यांना भगदाड पडले आहे. कर्ले गावाजवळील कर्ले कळशीवरील उतार भागावरील कठडे तुटले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. दोंडाईचा शहरात येण्या-जाण्यासाठी कर्ले (कळशी ) हा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावरुन दररोज भाविकांच्या वाहनांसह शेकडो वाहने, दुचाकी ये-जा करतात. परंतु या कर्ले घाटात रस्त्यावरचे कठडे काही ठिकाणी तुटले आहेत व हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने वाहतूकीस धोका निर्माण झाला आहे. घाटातील धोकादायक ठिकाणांची व नादुरुस्त कठड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बळसाणेसह परिसरातील वाहनधारक व भाविकांनी केली आहे.