पुणे । वनाज ते रामवाडी मेट्रो मर्गावर नळस्टॉप येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन मजली उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. याचा आराखडा व बांधकाम महामेट्रो कंपनीला देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे सतत वाहतूक कोंडीमुळे ग्रासलेला कर्वे रस्ता आता सुटकेचा निःश्वास टाकणार आहे.
नळस्टॉप चौकात उड्डाणपुल
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गीकेचे काम काही दिवसातच सुरू होणार आहे. कर्वे रस्त्याल्या एकही पर्यायी रस्ता नसल्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूकीची कोंडी असते. यामार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम काही दिवसातच सुरू होणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुरुळीत करण्यासाठी नळस्टॉप चौकात उड्डाणपुलाचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले. नळस्टॉप चौकातील उड्डाणपुल आणि मेट्रो मार्ग एकत्रीतरित्या होणे गरजेचे आहे. महामेट्रो कंपनीकडून मेट्रोचे काम करण्यात येत आहे. याच कंपनीला पुलाचे काम दिल्यास मेट्रो आणि उड्डाणपूल ही दोन्ही कामे एकाच दिवशी पुर्ण होऊ शकतील. त्यामुळे हे काम या कंपनीकडून करण्यात येणार आहे.
महामेट्रोबरोबर करार
मेट्रो मार्गावर पुलाचा आणि मार्गिकेचा एकसंघ आराखडा तयार करणे, स्ट्रक्चरल डिझाइन या कंपनीकडून करण्यात येणार आहे. यासाठी महामेट्रोबरोबर करार करण्यात येणार आहे. महापालिका अंदाजपत्रकामध्ये यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी होणारा खर्च टप्पाटप्याने महामेट्रोला देण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागपुरमध्येसुध्दा अशा प्रकारचा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.