कर्वे रस्त्यावर मेट्रोचे स्पॅन उभारणीचे काम सुरू

0

पुणे : महामेट्रोकडून वनाज ते गरवारे महाविद्यालय या पाच किलो मीटरच्या मार्गावर डिसेंबर 2019 पर्यंत मेट्रो प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यामुळे मेट्रोकडून पौड रस्त्यापाठोपाठ आता कर्वे रस्त्यावरही मेट्रोच्या स्पॅन उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्य चौक ते गरवारे महाविद्यालयापर्यंत मेट्रोच्या खांबाचे काम पूर्ण झाल्याने हे स्पॅन उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पौड रस्त्यापाठोपाठ आता कर्वे रस्त्यावरही मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. महामेट्रोकडून कर्वे रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालय ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्माराकापर्यंत कर्वे रस्त्याने मेट्रो मार्ग आहे. या रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालय ते स्वातंत्र्य चौकापर्यंत दुमजली उड्डाणपूल असणार आहे. त्यामुळे या पुलाच्या 13 खांबांचे काम सुरू करण्यात आले आहे.

गरवारे महाविद्यालय स्थानकाचे कामही हाती

स्वातंत्र्य चौकापासून पुढे खांबाचे काम पूर्ण झाल्याने त्यावर गर्डर लाँचिग मशीन बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला 2 स्पॅन बसविणे आवश्यक असून हे स्पॅन बसविण्यात आले आहेत. तर आता उर्वरीत स्पॅन गर्डर मशीनद्वारे बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याचवेळी महामेट्रोकडून गरवारे महाविद्यालय स्थानकाचे कामही हाती घेतले असून त्याचे पीआरआर्म उभारणी पुढील काही दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले.