पुणे । महापालिका मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी आता एलबीटी विभाग कर्मचार्यांची फौज उतरविली जाणार आहे. पालिका प्रशासनाने मार्च-2018 अखेर तब्बल 1 हजार 24 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. त्यासाठी मिळकतकर विभाग कर्मचार्यांची संख्या अपुरी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.मिळकतकर विभागास 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 1 हजार 800 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, या विभागास आतापर्यंत फक्त 850 कोटींचा कर वसूल करता आलेला आहे. तर या विभागाची थकबाकी तब्बल 2 हजार 400 कोटींची आहे. त्यामुळे न्यायालयीन तसेच इतर कारणास्तव वसूल न होणारी थकबाकी बाजूला ठेवत सुमारे 1 हजार 24 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. मात्र, त्यासाठी वसुली मोहीम वेगवेगळ्या पध्दतीने राबविली जाणार असली, तरी प्रशासनाकडे तेवढे कर्मचारी उपलब्ध नाहीत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने एलबीटी विभागाचे कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यशासनाने 1 जुलैपासून राज्यभरात एलबीटी बंद करून जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचारी सध्या एलबीटीच्या कामकाजाची पूर्तता करत आहेत. मात्र त्याऐवजी थकबाकी वसुली मोहीम उत्पन्नासाठी आवश्यक असल्याने या विभागास आवश्यक तेवढे कर्मचारी ठेऊन इतर कर्मचारी काही महिन्यांसाठी मिळकतकर विभागाच्या दिमतीला देण्यात येणार आहेत.