पुणे: माजी खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमध्ये पुन्हा घेण्यासाठी पुणे शहर काँग्रेस सरसावली आहे. ‘भाईं’चा काँग्रेस प्रवेश हा त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याच्या निकालानंतरच होईल असे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केल्याने तूर्त विषय थांबला आहे. प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यात अनौपचारिक चर्चांमध्ये ‘भाईं’च्या काँग्रेस प्रवेशाचा विषय अजेंड्यावर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कॉमनवेल्थ गेम्स’मधील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कलमाडी यांच्यावर गुन्हा दाखल असून, त्यांच्यावर अटकेचीही कारवाई करण्यात आली. ते सध्या जामिनावर असून त्यांच्याविरुद्ध दिल्ली येथे खटला सुरू आहे. कलमाडी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्यांचा काँग्रेस प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल, असे सांगण्यात आले आले आहे. कमलाडी खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना तशी विनंती करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.