पुण्यातील भाजपवर आणि त्यातही पक्षाच्या महापालिकेतील कामगिरीवर चोहोबाजूंनी टीका होते आहे. अशातच भाजपची कामगिरी समाधानकारक आहे, असे प्रशस्तीपत्र माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी दिले. खरे तर भाजपला हा धक्काच बसला असेल.
काँग्रेस पक्षातून कलमाडी यांना निलंबित केले आहे, तरीही काँग्रेसजनांशी त्यांची जवळीक ही अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांना पाठिंबा दिला होता. कलमाडी यांना काँग्रेसमध्ये परत घ्यावे अशी एक मोहीम पक्षात झाली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही तसे संकेत दिले होते. गेल्या तीन वर्षांत काँग्रेस पक्षाची पुण्यात धूळधाण झाल्यावर कलमाडी सक्रीय होणे किंवा तशा मागण्या होत राहाणे बंद झाले होते. राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा आरोपातून बाहेर पडणे यालाच कलमाडी यांनी प्राधान्य दिले; असे मानले जात होते. वाढदिवस अथवा सणावाराला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी एवढेच कलमाडी सक्रीय होते. या वातावरणात त्यांनी पुणे फेस्टिवल नेटाने चालू ठेवला होता. त्याच फेस्टिवलसाठीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपला दिलासावजा धक्का दिला.
महापालिकेत सत्ताधारी भाजपवर काँग्रेस पक्ष तुटून पडतोय. गटनेते अरविंद शिंदे, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अनेक मुद्द्यांवर भाजपला कोंडीत पकडले आहे, त्यामुळे कलमाडी यांच्या वक्तव्याचे पडसाद काँग्रेसमध्ये अधिक उमटणार आहेत. याशिवाय आता कमकुवत असलेली काँग्रेस अडचणीत येणार आहे. पक्षांतर्गत निवडणुका चालू आहेत; तिथे लगेचच कलमाडी फॅक्टरचा परिणाम दिसून येईल.
कलमाडी खासदार होते. महापालिकेत सर्वेसर्वा होते. तेव्हा सर्वाधिक बेफाम आरोप भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी केले होते. पुण्याच्या राजकारणातील खलनायक असे चित्र रंगवायचा प्रयत्न भाजप नेत्यांनी सातत्याने केला. कलमाडी विरोधासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. काँग्रेस पक्षातील कलमाडीविरोधक आणि भाजप अशी हातमिळवणी अनेकवेळा झाली. 1992 ते 2012पर्यंत पुण्याचे राजकारण हे कलमाडी केंद्रित होते. या कालावधीतही काँग्रेसमध्ये त्यांना विरोधकांशी लढावे लागलेच. एकदा ते आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ‘पुणे विकास आघाडी’ स्थापन केली. भाजप पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढविली होती. अटलबिहारी वाजपेयी कलमाडी यांच्या प्रचारासाठी आले होते. त्या निवडणुकीत कलमाडी यांना यश मिळाले नाही, त्यानंतर ते परत काँग्रेसवासी झाले. याकाळात भाजपने पवारविरोधाची लाईन सोडून कलमाडी यांना लक्ष्य बनविले होते. आता तेच कलमाडी जर भाजपची प्रशंसा करू लागले तर अधिक चलबिचल भाजपमध्येच होणार आहे.
पुण्याचा विकास हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र राहिले आहे. कलमाडी यांनी पुण्यात विकास कामे केली, शहराला कणखर नेतृत्व दिले; हे साधारण पुणेकर मान्य करतात. नेतृत्वहीन झालेल्या पुण्यात त्यामुळे त्यांचा उल्लेख गप्पांमध्ये होतोच; ही जमेची बाजू आहे. अनेक कारणाने अडचणीत आलेले कलमाडी त्यामुळे अडगळीत पडल्यासारखे झाले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी ते भाजपचा आधार घेतात का? ही चर्चा आता रंगू लागली आहे.