कलांची जोपासना करून त्या वृद्धींगत करण्याची गरज : ह. भ. प. मोरेश्‍वर बुवा जोशी चर्‍होलीकर

0

पुणे । शाहिरी ही खूप मोठी परंपरा आहे. देव, देश, धर्म यांचा वारसा घेऊन हजारो वर्षांची कीर्तनकारांची, संतांची, शाहीरांची परंपरा आहे. देवाचे अभिवादन आणि समाजाचे जागरण या दोन्ही गोष्टी या कलांमधून साधल्या आहेत. सध्या होणारे पाश्‍चात्यांचे आक्रमण आणि समाजामध्ये असणार्‍या बुद्धीभेदाला उत्तर देण्याचे सामर्थ्य या सगळ्या परंपरांमध्ये आहे. अशा कलांची जोपासना करीत असताना एखादी संस्था स्थापन करून ती कला वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. मोरेश्‍वर बुवा जोशी चर्‍होलीकर यांनी केले.

लालमहाल येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तनकार ह. भ. प. तुकाराम महाराज निंबाळकर, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष शाहीर प्रकाशदादा ढवळे, गोंधळी बागुजी रेणके, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या आणि 50 उदयोन्मुख शाहीरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

दिनदर्शिकेद्वारे शाहिरीचे काम राज्यभर पोहोचेल
महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाहिरी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये शाहीर परिषदेच्या 12 पदाधिकार्‍यांची माहिती आहे. दिनदर्शिकेद्वारे शाहीर परिषदेचे काम अनेकांपर्यंत पोहोचेल. शाहिरी क्षेत्रात काम करणार्‍या संघटना काय आहेत. याविषयी सगळ्यांना माहिती मिळावी ही यामागील भूमिका आहे. या दिनदर्शिकेद्वारे शाहिरीचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल, असा विश्‍वास शाहीर हेमंतराजे मावळे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती कालेकर यांनी तर अरुणकुमार बाभुळगांवकर यांनी आभार मानले.

परिवर्तन काळाची गरंज
एखाद्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य पोवाड्यामध्ये आहे. आपल्या कलेतून सामाजिक प्रबोधन घडविण्याचे काम अनेक वर्ष शाहीर करीत आहेत. अशाप्रकारे कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. देश पारतंत्र्यात असताना शाहीरांनी आपल्या पोवाड्यांमधून जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण केले आहे. त्यामुळे शाहीरांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही, असे चर्‍होलीकर यांनी यावेळी सांगितले.

कलेतून संस्कृतीचे दर्शन
डॉक्टर, इंजिनिअर झालात तरीदेखील आपल्या कलेचे जतन करा. आपल्या कलेतून संस्कृतीचे दर्शन घडत असते त्यामुळे संस्कृतीचे वारसदार व्हा. गुरुंनी शिकविलेल्या कलेकडे गांभीर्याने बघा. एखादी कला आत्मसात करण्यासाठी खूप मोठी तपश्‍चर्या करावी लागते. समर्पणाची भावना मनामध्ये असेल तर विद्या प्राप्त होईल. शाहिरी करण्यासाठी प्रतिभाशक्ती, अभिनय कौशल्य, लेखन, स्मरणशक्ती, पाठांतर, भावपूर्ण सादरीकरण हे गुण असावे लागतात. शाहिरी ही शिवाजी महाराजांची सेवा आहे त्यामुळे ती केवळ स्नेहसंमेलनापुरती मर्यादीत ठेवू नका, असे प्रकाश ढवळे यांनी सांगितले.