मुंबई-राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत दहावीची परीक्षा देण्यासाठी शाळेत हजर राहणे बंधनकारक होते, त्यानंतरच ते बोर्डाची परीक्षा देऊ शकत होते. मात्र आता कलाकार, खेळाडू यांना आपल्याला हव्या त्या क्षेत्रात करीयर करता यावे यासाठी सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोणाला कला किंवा क्रीडा यामध्ये आपले करीयर करायचे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपन बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. यामुळे ज्यांना करीयरसाठी वेगळे क्षेत्र निवडायचे आहे अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या ओपन बोर्डला सामान्य एसएससी बोर्डप्रमाणेच दर्जा असेल. या बोर्डाची परीक्षा डिसेंबर आणि जूनमध्ये घेण्यात येणार आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच दिव्यांगांना नियमितपणे शाळेत हजर राहणे अनेकदा अवघड असते. त्यांनाही या बोर्डअंतर्गत दहावीची परीक्षा देता येणार आहे. यामध्ये पाचवीपासून प्रवेश दिला जाणार असून दहावीपर्यंत विद्यार्थी याअंतर्गत बाहेरुन परीक्षा देऊ शकतात अशी माहितीही त्यांनी दिली. या बोर्डाचे कामकाज लवकरच सुरु होणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.