कलाकार व रसिकांसाठी पालिकेची 28 नाट्यगृहे सेवेत 

0
मुंबई : मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोगाच्या सूचनेनुसार कलाकार व रसिकांसाठी 28 उद्यानातील नाट्यगृहे लवकरच खुली करण्यात येणार आहेत. या नाट्यगृहांची आसन क्षमता 4 हजार 260 असून कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी खुली करण्यात येणार असल्याचे महापालिका उद्यान खात्याचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. उद्यानांमध्ये 28 खुली वर्तुळाकार नाट्यगृहे अस्तित्वात आहेत. या नाट्यगृहांमध्ये कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहे. तर त्या मंचाभोवती बसून कलेचा आस्वाद घेण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्था आहे.
या खुल्या नाट्यगृहांमधील आसन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी रसिकांना बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पायर्‍या आहेत. तसेच रसिकांना ऐसपैसरित्या बसता यावे, यासाठी या पायर्‍यांची रुंदी अधिक ठेवण्यात आली आहे.
या नाट्यगृहांची अंदाजित आसनक्षमता ही त्यांच्या-त्यांच्या आकारानुसार 50 आसनांपासून 500 आसनांपर्यंत अंदाजित असून सर्व नाट्यगृहांची एकूण आसनक्षमता ही सुमारे 4 हजार 260 एवढी आहे. या खुल्या नाट्यगृहांचा अधिक परिणामाकारक वापर करता यावा, यादृष्टीने गेल्या वर्षी स्थापन केलेल्या मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोग यांनी महापालिका प्रशासनास काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामख्याने खुल्या नाट्यगृहांचे नियमित परिरक्षण करण्यासह परिसरातील कलाकारांना त्यांच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या सूचनांचा समावेश आहे. यानुसार महापालिकेच्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच रसिकांना विविध कलांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अविष्करण आपल्या परिसरातील पालिका उद्यानांमध्येच अनुभवता येणार असल्याचे परदेशी म्हणाले.