चेन्नई । माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा नुकताच लोकार्पण करण्यात आलेला पुतळा आता वादाच्या भोवर्यात सापडला आहे. त्यांच्या या शिल्पात कलाम हे वीणा वादन करतांना दर्शविण्यात आले असून याभोवती भगवद्गीतेतल्या काही ओळी कोरण्यात आल्या आहेत. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. यानंतर रविवारी सकाळपासून यावर वाद सुरू झाले. कलाम हे कोणत्याही धर्माशी संबंधीत नसल्यामुळे त्यांच्या पुतळ्याभोवती सर्व धर्मग्रंथांमधील ओळी असणे आवश्यक होते असा विचार पुढे आला आहे. तर वीणावादनावरून काही मुस्लीम संघटना नाराज झाल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तामिळनाडूतल्या बर्याच नेत्यांनी याला विरोध दर्शविला आहे. द्रविड संस्कृतीला निकृष्ट दर्शविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप तेथील राजकारण्यांनी केला आहे. यातून तामिळ अस्मितेच्या मुद्याला हवा देत भाजपला विरोध करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून येत्या काही दिवसांमध्ये हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे.
स्टॅलीन यांची टीका : डीएमके नेते एम.के. स्टॅलीन यांनी कलाम यांच्या शिल्पावर रविवारी नाराजी व्यक्त केली. ते एका कार्यक्रमात म्हणाले की, कलाम यांच्या पुतळ्याशेजारी भगवद्गीतेचे श्लोक कोरणे गैर आहे. कलाम यांच्या पुतळ्याशेजारी तिरुक्करल ( तामिळ महान ग्रंथ) या ग्रंथातील ओळी का कोरल्या नाहीत? असा सवालही स्टालीन यांनी उपस्थित केला आहे. कलाम यांच्या पुतळ्याशेजारी भगवद्गीतेचे श्लोक कोरून कलाम यांना हिंदू धर्माचा महान ग्रंथप्रेमी अशा रुपात सादर करण्याचा हा प्रयत्न तर नव्हे ना, असे मत ’व्हिसीके’चे नेता तिरुमवलन यांनी व्यक्त केले आहे.
वायको झाले आक्रमक
तामिळ नेते वायको यांनीही भाजप सांस्कृतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. भगवद्गीता हा ग्रंथ तिरुक्करलपेक्षा अधिक महान आहे का?, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कलाम यांनी स्वत: ग्रीसच्या संसदेत संबोधित करताना तिरुक्करल ग्रंथातीलच काही ओळी म्हटल्या होत्या. त्यांनी या ग्रंथामधूनच प्रत्येक देश हा माझा देश आहे, आणि सर्व लोक माझे नातेवाईक आहेत’, अशा ओळी म्हटल्या होत्या. मात्र असे प्रकार करून भाजप काय करू इच्छिते हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे असेही वायको यांनी म्हटले आहे.