अभिनेता सुबोध भावे पुरस्काराने सन्मानित
सांगवी : र्हिदम अॅकॅडमी व कलाश्री संगीत मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरामध्ये उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरूवात शाश्वती चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंती व भजन सादर करून रसिक श्रोत्यांची त्यांनी मने जिंकली. त्यांना तबला साथ नंदकिशोर ढोरे व हार्मोनियम साथ गंगाधर शिंदे यांनी केली. त्यानंतर कथक नृत्यांगना प्रिया बिरारी यांनी गणेशवंदना सादर केली. त्यानंतर अकादमीच्या सर्व बालचमूंनी आपल्या गायन व नृत्य कौशल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात 50 कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी कै. रुख्मिणी बाई पांडुरंग शिराळकर (राजोपाध्ये) यांच्या स्मरणार्थ साधक हा पुरस्कार कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पंडित िुधाकर चव्हाण यांना शिराळकर (राजोपाध्ये) परिवारातर्फे प्रदान करण्यात आला.
ग्लोविंग ब्रेन वेलनेस अॅकॅडमीचे संस्थापक राजेश खेले यांच्यातर्फे दिला जाणारा समर्थ समृद्ध राष्ट्र पुरस्कार अभिनेते सुबोध भावे यांना प्रदान करण्यात आला. तसेच मोस्ट प्रॉमिसिंग म्युझिक डायरेक्टर हा पुरस्कार प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर प्रशांत ओहोळ यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन अवधूत वाडकर उपस्थित होते. रिदम अकॅडेमिचे विद्यार्थी चित्रकार पूर्वेश चव्हाण व श्रावणी कदम यांनी रेखाटलेली चित्रे सुबोध भावे व अवधूत वाडकर यांना भेट म्हणून देण्यात आली. या स्नेहसंमेलनास वाहतूक निरीक्षक किशोर म्हसवडे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, जवाहर ढोरे, हिरेन सोनावणे, सुहास राजोपाध्ये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांचन पांचाळ व श्वेता सावंत यांनी केले.