कला प्रदर्शन सत्काराचा बहुमान चित्रकार प्रा. चौधरी यांना

0

धुळे : महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी कला प्रदर्शनापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ व थोर कलावंतांचा सत्कार करण्याची प्रथा शासनाने सुरू केली आहे. यंदाच्या धुळे येथे होणाऱ्या 57 व्या विद्यार्थी विभागाच्या राज्यकला प्रदर्शनाच्या निमित्ताने या सत्कारासाठी कला संचालनालयाने धुळे येथील ज्येष्ठ चित्रकार प्रा. जी. बी. चौधरी यांच्या नावाची एकमताने शिफारस केली असून अशा प्रकारचा सन्मान लाभलेले ते धुळे जिल्ह्यातील एकमेव व पहिले चित्रकार आहेत.

57 व्या राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी विभागाचे उदघाटन, पुरस्कार वितरण समारंभ व सत्कारमूर्ती प्रा. चौधरी यांचा सत्कार समारंभ बुधवार 4 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे सभागृह (हिरे भवन) येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास व वक्फ विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उदघाटन होईल. राज्याचे गृहनिर्माण व उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर प्रमुख पाहुणे असतील. आमदार अनिल अण्णा गोटे, आमदार कुणाल पाटील, महापौर कल्पना महाले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे या सोहळ्यास सन्मानीय अतिथी असतील.

प्रा. चौधरी हे भारतीय अलंकारीक शैलीत काम करणारे प्रसिध्द असे चित्रकार आहेत. त्यांचा जन्म 1 जून 1945 रोजी पिंपळनेर येथे झाला आहे. त्यांचे शिक्षण जीडी आर्ट, एएम, कला निकेतन नाशिक येथे झाले आहे. विद्यार्थी दशेपासून ते भारतीय कलेचे चाहते असून, त्याचे विविध प्रयोग आपल्या चित्रशैलीतून त्यांनी व्यक्त केले आहेत. ते 1973 पासून ते निवृत्तीपर्यंत श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये कार्यरत होते. प्रा. चौधरी यांनी विविध कला प्रदर्शनात आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन मांडले आहे. सृष्टी आर्ट गॅलरी, औरंगाबाद, बडोदा, जहाँगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे त्यांनी आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन मांडले आहे. याशिवाय विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कला प्रदर्शनातही प्रा. चौधरी यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यात ललित कला अकादमी मेळा, बंगळूर, ललित कला अकादमी मेळा, कोलकता, ललित कला अकादमी मेळा, नवी दिल्ली, दक्षिण- उत्तर विभाग सांस्कृतिक केंद्र, नागपूर, अनटायटल आर्ट एज्युकेशन, औरंगाबाद, लोकमत श्लोक, औरंगाबादसह, ठाणे फेस्टिव्हलचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रा. चौधरी यांच्या चित्रांचा संग्रह मि. गुप्ता ॲण्ड सन्स, औरंगाबाद यांच्याकडे आहेत, तर काही पेंटिंग्ज परदेशातही पोहोचले आहेत. त्यापैकी चार पेंटिग्जस इस्त्राईल येथील संस्थेकडे आहेत. शहा ॲण्ड कंपनी, मुंबई, लोकमत श्लोक, औरंगाबादने त्यांच्या चित्रांचा संग्रह केलेला आहे. 57 व्या कला प्रदर्शनात प्रा. चौधरी यांच्या चित्रांचा समावेश राहणार आहे.