कला ही जगायला शिकवते : ल.म. कडू

0

पुणे : निसर्गाच्या दूर कधीही जाऊ नका. कला ही जगायचे कसे ते शिकवते. कलेमध्ये साधना, मार्गदर्शन महत्त्वाचे असतेच पण, हे काही नसले तरी तुम्ही कलाकार बनू शकता, असे उद्गार ज्येष्ठ चित्रकार ल. म. कडू यांनी काढले.

निमित्त होते महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ आणि संवाद संस्थेच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक ल.म. कडू, नजीर फतेहपुरी आणि राहुल कोसंबी यांच्या सत्काराचे! माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ.न.म जोशी, डॉ. संगीता बर्वे, संवादचे सुनील महाजन, मुख्याध्यापिका संजीविनी ओगले, निकिता मोघे उपस्थित होते.

‘मैं बच्चों मे आकर बच्चा बन जाता हूँ… सीधा साधा सच्चा हो जाता हूँ…’ व ‘बच्चा हिंदू है न मुसलमान… बच्चा है मासूम सा इन्सान…’ या दोन कविता सादर करत नजीर फतेहपुरी यांनी मुलांच्या मनाचा ठाव घेतला. राहुल कोसंबी म्हणाले, लेखक हे पाठ्यपुस्तकातून मुलांना भेटत असतात. शाळेच्या वयातच वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. सबनीस म्हणाले, ल.म. कडू यांचे बालसाहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. विद्रोही, दलित साहित्याला आजही काही लोकांकडून नाक मुरडले जाते. महापुरुषांना कुठल्याही जातीपातीत अडकवू नका!