कल्याण : कल्याणमध्ये आज पोलिस आणि रिक्षावाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांसोबत अरेरावी केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. काही वेळानंतर त्यांच्यातील वाद सोडवून अटक केलेल्या चार जणांना लगेचच सोडण्यात आले. मात्र, नेहमी प्रवाशांसोबत, एस.टी. चालकांसोबत अरेरावी करणारे रिक्षाचालक आता थेट पोलिसांसोबत अरेरावी करीत असल्याने रिक्षाचालकांना कायद्याचा धाक राहीला नही, असेच चित्र दिसतंय.
कल्याण शहरात वाढलेल्या अडसर रिक्षास्टॅंडमुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या ठिकाणी निर्माण होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी पोलिसांनी अडसर रिक्षास्टॅंडवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज शहरातील विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाशांचे भरउन्हात प्रचंड हाल झाले. त्यातूनच रिक्षावाले आणि पोलिस यांच्यामध्ये वाद आणि बाचाबाची झाल्याचे देखील प्रकार घडले. पोलिसांसोबत हु्ज्जत घातल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, काही वेळानंतर लगेचच पोलीस आणि रिक्षावाले यांच्यामधील वाद मिटवून ताब्यात घेतलेल्या चार जणांना सोडण्यात आले. अखेर पोलिस ठाण्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर दुपारी दोन वाजता बंद मागे घेण्यात आला. सायंकाळी सातपर्यंत बंद करण्यात येणार होता; परंतु कोणतेही ठोस आश्वासन पदरात न पडताही रिक्षाचालकांनी दुपारीच तो मागे घेतला.