कल्याणात स्वच्छतागृहाअभावी गैरसोय

0

कल्याण : कल्याणच्या तहसील कार्यालयात दिवसभरात विविध कामासाठी नागरीक ये-जा करत असतात. विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी याठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. मात्र या कार्यालयाच्या परिसरात एक ही स्वच्छतागृह नसल्याने या कार्यालयातील कर्मचार्यांसह येणार्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

शासन आणि न्यायालय स्तरावरून गर्दीच्या ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले असले तरी आजही अनेक सरकारी कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येत आहे . कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या तहसील कार्यालयात शालेय दाखले काढण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीच्या संदर्भातील खटल्याच्या सुनावणीसाठी या कार्यालयात आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकाचा मोठा वावर असल्यामुळे दिवसभर हे कार्यालय गजबजलेले असते. तहसील कार्यालयात कामाचा व्याप व कामानिमित्त येणार्या नागरिकांच्या संख्या पाहता अतिशय अडगळीची आणि कोंदड आहे. त्यातच या इमारतीत स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यामुळे या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांसह कामानिमित्त येणार्या नागरिकांची कुंचबना होत असून थेट पंचायत समिती कार्यालय किंवा कल्याण रेल्वे स्थानक गाठावे लागते.

दरम्यान शासनाने स्टेशन परिसरात अपुर्या जागेत असलेले हे कार्यालय स्थलांतरीत करण्याच्या हालचाली चालविल्या असून यामुळेच या जुन्या इमारतीत कोणतीही डागडुजी किंवा स्वच्छतागृहाची सुविधा केली जात नसल्याचे सांगितले जात असले तरी या कामास बराच कालावधी लोटणार असल्याने तात्पुरती तरी सोय करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.