कल्याण डोंबिवलीत 245 अतिधोकादायक इमारती

0

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली असून यात क प्रभाग क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 130 अतिधोकादायक इमारती आहेत. तर ग्रामीण भागातील आय आणि जे प्रभागातील इमारतींची अद्याप पालिका प्रशासनाकडून मोजदादच करण्यात आलेली नाही.दरम्यान पालिकेच्या दहा प्रभागांत असलेल्या अतिधोकादायक 245 इमारतींवर पावसाळ्यापूर्वी हातोडा मारण्याचा कार्यक्रम पालिका प्रशासनाकडून आखण्यात आला असून महापालिकेच्या नव्या कायद्यात या इमारतीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पालिका प्रशासनाची नसल्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी मालकांशी तडजोड करत पुनर्वसनासंदर्भात निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाकडून अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिद्ध केली जाते. या इमारतींमध्ये राहणारे भाडेकरू इमारत रिकामी करण्यास तयार होत नसल्यामुळे कारवाई करण्यास अडथळे येतात. प्रत्येक पावसात एखादी तरी अतिधोकादायक इमारत कोसळत असल्यामुळे पालिका प्रशासनावर अतिरिक्त ताण पडण्याबरोबरच रहिवाशांच्या पुनर्वसनाचा किंवा तात्पुरत्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे पालिका प्रशासनाने यंदा पावसाळ्याच्या दोन महिने आधी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी तयार केली असून या इमारतींवरील कारवाईसंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

अतिधोकादायक इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात भाडेकरू राहत असून अत्यल्प दरात पागडी पद्धतीने ही घरे काही वर्षांपूर्वी भाडेकरूंना देण्यात आली आहेत. मात्र आता या घराच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. भाडेकरूंना बाहेर काढून इमारत मालकांना या इमारतीची जागा हवी आहे. मात्र आपल्याला या इमारतीतच घरे मिळावीत, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात असल्यामुळे मालक आणि भाडेकरू वाद संपण्याची चिन्हे नाहीत. एकदा घर रिकामे केल्यानंतर भाडेकरूंचा या घरावरील हक्क संपत असल्यामुळे जीव गेला तरी घरे रिकामी न करण्याची भाडेकरूंची भूमिका आहे. दुसरीकडे पालिका अधिकार्‍यांना हाताशी धरून या इमारती धोकादायक जाहीर करत तोडल्या जात असल्याचा आरोप भाडेकरूंकडून केला जात आहे. त्यातच महापालिकेच्या कायद्यात या इमारतीत राहणार्‍या नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पालिकेची नसल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्यामुळे या वादावर तोडगा निघण्याची शक्यता कमीच आहे.

प्रभागातील आकडेवारी
पालिका क्षेत्रात असलेल्या प्रभाग क्रमांक 1मध्ये 14 धोकादायक, तर 7 अतिधोकादायक, प्रभाग क्र. 2मध्ये 4 धोकादायक, तर 37 अतिधोकादायक, प्रभाग क्र. 3 क मध्ये 89 धोकादायक तर 134 अतिधोकादायक, प्रभाग क्र. 5 ड मध्ये 62 धोकादायक, तर 3 अतिधोकादायक, प्रभाग क्र. 6 फमध्ये 122 धोकादायक, तर 26 अतिधोकादायक, प्रभाग क्र. 7 ह मध्ये 51 धोकादायक, तर 39 अतिधोकादायक, प्रभाग क्र. 8 ग मध्ये 24 धोकादायक तर 33 अतिधोकादायक, अशा एकूण 357 धोकादायक तर 279 अतिधोकादायक इमारती असल्याची नोंद असून प्रभाग क्र. 4 जे, प्रभाग क्र. 9 आय आणि प्रभाग क्र. 10 ई मध्ये असलेल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची मोजणी करण्यात आलेली नाही.