कल चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका जमा करण्यासाठी शिक्षकांची दमछाक

0

पिंपरी-चिंचवड : आजपासून दुसर्‍या नैदानिक चाचणी परीक्षेला सुरुवात झाली आहे. ही चाचणी परीक्षा बुधवारपासून शनिवार (दि. 11) पर्यंत चालणार आहेत. या चाचणी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका मिळण्यासाठी खाजगी शाळेतील शिक्षकांना प्रश्‍नपत्रिका पुरवठा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

खासगी शाळांतील शिक्षकांना त्रास
राज्य शासनाने पाहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला. पण विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी तपासण्यासाठी वर्षातून तीन वेळा ‘कल चाचणी’ घेण्यात येऊ लागली. या चाचणीसाठी शासनाकडून प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात येतात. शासकीय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नैदानिक चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका योग्यरीत्या व वेळेत पुरविण्यात येतात. मात्र खाजगी शाळांना त्या पूर्णसंख्येने आणि वेळेतही पुरविल्या जात नाहीत.शिक्षण मंडळाच्या चाचणी विभागाच्या वतीने शहरातील सर्व शाळांना नैदानिक चाचणी प्रश्‍नपत्रिका पुरविण्यासाठी शहरात ठराविक शाळांमध्ये याची केंद्रे ठेवण्यात आली आहेत. या केंद्रांमधून सरकारी शाळांना पूर्णसंख्येने आणि वेळेत प्रश्‍नपत्रिका देण्यात येतात, मात्र खाजगी शाळेतील शिक्षकांना ताटकळत ठेवण्यात येते. त्यामुळे खाजगी शाळेतील महिला शिक्षकांची मोठी दमछाक होत आहे.

प्रश्‍नपत्रिका फुटण्याचा धोका
खाजगी आणि सरकारी अशा सर्व शाळांमधील विद्यार्थी संख्येची शासन दरबारी नोंद असते. त्यामुळे शासनाला सर्व विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात परीक्षेचे साहित्य उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. परंतु नैदानिक चाचणी विभागाकडून मात्र खाजगी शाळांना मर्यादित प्रश्‍नपत्रिका देण्यात येतात. शासनाच्या प्रश्‍नपत्रिका झेरॉक्स करून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याची वेळ खाजगी शाळांवर येत आहे. यामुळे प्रश्‍नपत्रिका फुटण्याचा मोठा धोका उद्भवला आहे.

खासगी शाळांना स्वायत्तता द्यावी
शिक्षकांना प्रश्‍नपत्रिका मिळण्याचा निश्‍चित वेळ ठेवण्यात आला नसल्याने कोणत्या वेळेत केंद्रांवर जाऊन प्रश्‍नपत्रिका जमा कराव्या याबाबतही खाजगी शाळेच्या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. तसेच या प्रश्‍नपत्रिका शाळेतील इतर कर्मचार्‍यांना जमा करता येणार नाहीत; तर त्या केवळ शिक्षकांनीच जमा कराव्या, असे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले असल्याने शिक्षकांनी चालू वर्ग सोडून जायचं कार? असा प्रश्‍न खाजगी शाळेतील शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. शासनाने केवळ सरकारी शाळांची नैदानिक चाचणी घ्यावी, खाजगी शाळांची नैदानिक चाचणी घेण्यासाठी खाजगी शाळांना स्वायत्तता द्यावी, अशी मागणीही खाजगी शाळांमधून केली जात आहे.